नंदुरबार : वृत्तसंस्था
प्रेमसंबंधाचे ब्रेक अप झाल्यानंतर संतप्त झालेल्या माजी प्रियकराने भावासोबत घरी जाणाऱ्या मुलीला रस्त्यात गाठून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आड आलेल्या भावाने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत, मुलीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा प्रकार नंदुरबार शहरात घडला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. नंदुरबार तालुक्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचे नांदरखेडा येथील राजेंद्र सुरेश सूर्यवंशी (२४) या युवकासोबत प्रेमसंबध होते; परंतु कालांतराने दोघांच्यात ‘ब्रेक अप’ झाला होता.
या ब्रेकअपमुळे सैरभैर झालेला राजेंद्र सातत्याने युवतीचा पाठलाग करून तिची मनधरणी अथवा भांडण करत होता. १२ मे रोजी युवती दुपारी शहरातील दुधाळे शिवारातील हस्तीनगरातून भावासह मोटारसायकलीने आपल्या गावाकडे जात असताना एका ठिकाणी राजेंद्र व त्याच्या मित्राने दोघांना गाठून थांबवले होते. दरम्यान राजेंद्र याने युवतीसोबत वादही घातला होता. यावेळी तिने दाद न दिल्याने तिला मोटारसायकलीवर बसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न राजेंद्र आणि त्याच्या मित्राने केला होता. दरम्यान दोघांना विरोध करणाऱ्या युवतीच्या भावालाही दाेघांनी मारहाण केली होती. प्रसंगी परिसरातील नागरिक जमा झाल्याने दोघांनी पळ काढला होता. यातही जाता-जाता युवतीला उचलून घेऊन जाईल, कुटुंबाला संपवून टाकेल, अशी धमकी दिली होती. यातून घाबरलेल्या युवतीने तात्काळ नंदुरबार शहर पोलिस ठाणे गाठले होते. याप्रकरणी १९ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजेंद्र सुरेश सूर्यवंशी, रा. नांदरखेडा, ता. नंदुरबार (२४) आणि त्याचा अनोळखी मित्र अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक संपत वसावे करत आहेत.