मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, एक आवाहन केलं होतं की राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये, त्यामुळे त्याच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. काही दिवसांआधीच सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. यावर सर्वच नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच शिंदे ठाकरे असे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. संजय राऊतांनी सरकारविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, असं आवाहन संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे या वक्तव्यावरून संजय राऊतांवर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.