जळगाव : प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका हद्दीत लोकसंख्या ही १७ टक्क्यांच्या वर वाढलेली आहे. जळगाव महानगरपालिका हद्दीतील वार्डांची संख्या ही ७५ होती. त्यामुळे लोकसंख्या वाढलेली आहे तर जळगाव महानगर पालिका हद्दीत वार्डांची संख्या ही जवळपास ८७ वार्डांची करावी अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
पृथ्वीराज सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे, की जळगाव महानगरपालिका हद्दीत स्वतंत्र वार्ड एका वर्गात एक नगरसेवक करून वार्डांची रचना करावी म्हणजे प्रत्येक वार्डासाठी एक स्वतंत्र नगरसेवक मिळेल म्हणजे तो त्या वार्डाचे चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करू शकेल. चार नगरसेवकांचा एक प्रभाग ही रचना असल्यामुळे चार नगरसेवक निवडून येतात आणि प्रभागातील जनतेचे काम चांगल्या प्रकारे होत नाही नगरसेवक एकमेकांवर कामाची जबाबदारी एकमेकांवर ढकलतात. वार्डांची रचना करताना एका कॉलनीचे दोन तुकडे होऊ नये तसेच मोठे रस्ते यांचे विभाजन न होता निवडणूक आयोगाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून वार्डाची रचना करावी. आजच्या लोकसंख्येनुसार वार्डांची रचना आणि वार्ड संख्या वाढण्यासाठी प्रस्ताव पाठवावा मागणी निवेदनातून केली आहे.