जळगाव : प्रतिनिधी
रावेर शहरासह परिसरामध्ये दहशत माजविणाऱ्या तीन गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख इरफान हबीब तडवी (२१), जमील उर्फ गोलू बिस्मिल्ला तडवी (२०) व शब्बीर रमजान तडवी (२२, तिन्ही रा. पिंप्री, ता. रावेर) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
तिन्ही गुन्हेगार हे टोळीने राहून रावेर शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवीत होते. टोळीची नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन नागरिकांचे जीवितास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नव्हती. त्यामुळे तिघांचा हद्दपार प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी पडताळणी करून चौकशी केली असता, तिन्ही गुन्हेगारांना वारंवार गुन्हे करण्याची सवयी असल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन तिघांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.