धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात बाजारात बोगस कंपन्या, परवाना नसलेली अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. अशा अनधिकृत बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बीटी, आर- आरबीटी व बीटीबीजी-३ या नावाने संबोधतात. या अवैध बियाणांना शासनाची मान्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा अनधिकृत कंपन्यांच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच एचटीबीटी बियाण्यांची खरेदी व शेतात लागवड करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी , धरणगाव पी.जे.चव्हाण यांनी केले आहे.
अवैध बियाणांची विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे अनधिकृत कापूस बियाणे लागवड केलेल्या कापूस पिकाच्या पानांचे नमुने यांची एचटीबीटी जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत आहे. नमुना तपासणीअंती एचटीबीटी जनुके आढळल्यास संबंधितावर कारवाई होऊ शकते. कृषी विभाग व पोलिस एचटीबीटी बियाणे विक्रीवर लक्ष ठेवून आहेत हे बियाणे विक्रीचा प्रयत्न करू नये, असे निर्देश आहेत.