चोपडा : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील लासुर परिसरात अवैध लिंबाची वृक्षतोड करून ते ट्रॉलीत भरून रात्री लाईट बंद ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात रस्त्याच्या विरुद्ध साईडने चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देऊन लाकडांचे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्यावर पलटी झाले. यावेळी झालेल्या भीषण अपघातात कृष्णापूर(ता.चोपडा) येथील ३५वर्षीय आदिवासी तरुण दुचाकी चालक जागीच ठार झाला तर दुचाकीवरील मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना लासुर-चोपडा रस्त्यावर घडली. अपघातानंतर मयत झालेला व गंभीर जखमी तरुणांना नागरिकांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तर गंभीर जखमी तरुणास जळगावला हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील लासुर परिसरात जिवंत लिंबाची अवैध वृक्षतोड करून संध्याकाळी ट्रॅक्टर क्रमांक-MH-18 N 4438 च्या ट्रॉलीत भरून ट्रॅक्टरचे लाईट बंद असतांना देखील रस्त्यावर भरधाव वेगाने शहराकडे येत असतांना रस्त्याच्या विरुद्ध साईडने चालवून समोरून येणारी दुचाकी होंडा शाईने क्रमांक-MH-04GK- 6147 हिस जोरदार धडक देऊन अवैध लिंबाचे लाकुड भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या कडेला पलटी झाले.
यावेळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक सुकलाल केना बारेला (३५) रा.कृष्णापूर (ता.चोपडा) हा आदिवासी तरुण जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना लासुर-चोपडा रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावरील माजी नगरसेवक रमेश शिंदे यांच्या शेताच्या समोर घडली.घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे अपघातात मयत झालेला तरुण व गंभीर जखमी तरुणाला नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यावेळी डॉक्टरांनी सुकलाल केना बारेला यास मृत घोषित केले.तर गंभीर जखमी तरुणास जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले असून त्याचेवर उपचार सुरू आहेत.
या बाबत मयत तरुणाचा लहान भाऊ दिलीप केना बारेला (२७) रा.कृष्णापूर (ता.चोपडा) याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुध्द भादवि कलम ३०४ (अ),२७९,३३७,३३८,४२७, मोटर व्हीकल ऍक्ट-१८४,१३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त ट्रॅक्टर जप्त केले आहे.तसेच पोलीस फरार ट्रॅक्टर चालकाचा व मालकाचा कसून शोध घेत आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.जितेंद्र सोनवणे करीत आहेत.