मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या २ मे पासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यापासून कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आज शरद पवार यांनी यावर मौन सोडत पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.” “देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.