छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत असतांना दिसत आहे. बलात्कार, खून, अनैतिक संबंधातून फसवणूक, आत्महत्या यासांरख्या घटना सातत्याने राज्यामध्ये घडत आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटीत) नर्स युवतीला एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तसेच तिला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. मात्र, या तरुणाने संबंधित प्रेयसीला सोडून देत दुसरीसोबतच विवाह केला.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलले. प्रियकराकडून फसवणूक सहन न झाल्याने या तरुणीने राहत्या घरातील टॉयलेटमध्ये विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना 1 मेच्या रात्री घडला. कल्पना विठ्ठलराव जाधव (30, रा. नांदेड, ह.मु.मोहिणी अपार्टमेंट, जयसिंगपुरा) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर किसन पवार (36, रा. घाटी दवाखाना) असे आरोपीचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यात मृत कल्पनाच्या आईने फिर्याद दिली. असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना ही 2016 पासून घाटीमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. 26 एप्रिल रोजी ती गावी नांदेडला आली. तेथून 30 एप्रिलला कामावर रुजू झाली.
1 मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मृताची आई व भाऊ तिच्या जयसिंगपुरा येथील फ्लॅटवर आले. त्याठिकाणी तिघांनी गप्पा मारल्या. काही वेळाने कल्पना टॉयलेटला गेली. त्याच कालावधीत दोघांना झोप लागली.
दरम्यान, फिर्यादीची दुसरी मुलगी घरी आली. तेव्हा भावाने दरवाजा उघडला. त्यानंतर आई, भाऊ आणि बहिण बोलत असतानाच त्यांनी कल्पना आणखी टॉयलेटमधून बाहेर कशी आली नाही, अशी विचारणा केली. यावेळी तिच्या मोबाईलवर फोन लावला असता, तो बाहेरच होता. त्यानंतर तिघांनी टॉयलेटचा दरवाजा तोडला. तेव्हा कल्पनाने हाताला इंजेक्शन टोचल्याचे दिसून आले. यानंतर तिला बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर पवारच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साधना आढाव करीत आहेत.