जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीची काल वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. काही दिवसांआधी मंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी १५० हून जास्त बैठका झाल्याचे सांगितले होते. त्याचा दाखला अजित पवार यांनी कालच्या भाषणात दिला. मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा हिंदकेसरी महाराष्ट्राला मिळाला, असा दावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्यांचे षडयंत्र सुरू होते, हे त्यांनीच सांगून टाकले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी एवढ्या बैठका घेतल्या? असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता. त्यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलण्याचे टाळले असले तरी मोठे आणि तितकेच सूचक विधान केले आहे.
अजितदादा पवार लवकरच आमच्याकडे येणार आहेत. दादा आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू, असे मोठे विधान गुलाबराव पाटील यांनी केले. ते आज जळगावात माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, सध्याच्या राज्याच्या राजकीय वर्तुळात अजित पवार केंद्रस्थानी बनले आहेत. अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अजित पवार यांची प्रत्येक कृती आणि त्यांच्या विधानांवर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. काल अजित पवार यांना वज्रमूठ सभेत केलेल्या भाषणावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. गुलाबराव पाटलांनी अजित पवार सोबत येणार असल्याचा दावा केला आहे.