लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सध्या नवरात्री सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. महिला शक्तीचा जागर होत आहे. याच धर्तीवर जिंदगी फाउंडेशनने चाळीसगाव तालुक्यातील जुनोने आणि नाईक नगर तांडा या अतिशय दुर्गम गावात महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल जनजागृती केली. जुनोने हे गाव कन्नड घाटाच्या वरच्या बाजूला आहे. त्यामुळे हे गाव दुर्गम भागात मोडते. जिंदगी फाउंडेशनने गावातील महिला आणि किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सर्व महिला आणि किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आले.
जिंदगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळी विषयी शास्त्रीय माहिती सांगितली. मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. सॅनिटरी नॅपकिन वाटतांना कपड्याऐवजी महिलांनी सॅनिटरी पॅड वापरावे हा सल्ला सुद्धा दिला. सॅनिटरी नॅपकिन डेमोक्रॅटिक इंडियन या संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आले होते.
याच कार्यक्रमात जिंदगी फाउंडेशनकडून सर्व महिलांना साड्या तसेच मुलींना ड्रेस वाटण्यात आले.
या कार्यक्रमाला जिंदगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव, सचिव अजय पाटील, ममता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही. पी. पाटील सर, जुनोने गावचे सरपंच गोरखनाथ राठोड, उपसरपंच संजय भिल्ल, चैतन्य तांडाचे सरपंच दिनकर राठोड, कृषी सहाय्यक तुफान खोत, सम्राट सोनवणे व गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवनेरी फाउंडेशनने परिश्रम घेतले.