मुंबई : वृत्तसंस्था
विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या देखील बातम्या मोठ्या प्रमाणात येवू लागल्याने अजित पवार माध्यमासमोर येत खुलासा केला होता पण त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सूचक विधान करीत अनेकांना कोडे पाडले असून आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही.’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात मोठ्या फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसर्फे आयोजित युवा मंथन कार्यक्रमात पक्षाच्या मुंबईतील युवा संघटनेशी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, राज्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी कष्ट करणारे, वेळ देणारे, लोकांमध्ये समरस होणारे हजारो कार्यकर्ते आहेत. पण त्यामध्ये काही बदल करण्याचे मत काही वक्त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे पक्षाला नेतृत्व तयार करण्यासाठी तरूणांपासून सुरुवात करावी लागेल. शरद पवार म्हणाले की, मी पक्षाचे प्रांताध्यक्ष, इतर नेते आणि मुंबईचे कार्याध्यक्ष यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगणार आहे की, जे लोक संघटनेत मागील सात-आठ वर्षे एकाच पदावर काम करत आहेत, त्यात बदल करावा. युवकांना संघटनेत घ्यावे. त्यातून त्यांना कामाची संधी द्यावी. या कामातून जो आपले स्थान प्रस्थापित करेल त्याला महानगरपालिकेत संधी द्यावी.
शरद पवार म्हणाले, समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी वर्गवारी कशी करायची याचा विचार करायला हवा. संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षात करण्याचा आग्रह सर्व वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल.