कोल्हापूर : वृत्तसंस्था
पार्टटाइम जॉबच्या नादात सॉफ्टवेअर इंजिनीअर प्रशांत शहापुरे (२९) यांची तब्बल २० लाखांहून अधिक रकमेने ऑनलाइन फसवणूक झाली. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ते मूळचे कोल्हापुरातील आहेत.
शहापुरेंना फेब्रुवारीमध्ये टेलिग्रामवर प्राजना जानकी नामक महिलेचा मेसेज आला. चित्रपटांचे घरबसल्या रेटिंग करण्याचा पार्टटाइम जॉब असल्याचे तिने सांगितले. इंटरनेट प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून शहापुरेंना रेटिंगचे टास्क दिले. त्यांना ‘सिनेस्तान ऑनलाइन अर्निंग’ या टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले. पुढच्या टास्कसाठी त्यांना ११ हजार जमा करण्यास सांगितले व येथूनच ते फसत गेले. त्यांच्या व्हर्चुअल खात्यातील रक्कम ‘निगेटिव्ह’मध्ये गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी ते पैसे भरले व खात्यात नफ्यासह रक्कम दिसू लागली. शहापुरेंनी ५ मार्च ते ३० मार्च या कालावधीत टप्प्याटप्प्याने २० लाख ५४ हजार रुपये भरले; मात्र त्यातील एक पैसाही मिळाला नाही. पुढे त्यांना मुंबईतील कार्यालयाचा पत्तादेखील दिला. शहापुरेंनी माहिती घेतली असता तो इरोस इंटरनॅशनलचा पत्ता होता व त्यांच्याकडून मुव्ही रेटिंग होत नसल्याचे सांगण्यात आले.