मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात शिंदे व ठाकरे गटाच्या महत्वपूर्ण निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. राज्यातील शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या सत्तासंघर्षाची सुनावणी १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली, मात्र अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते निकालाचे अंदाज लावत आहेत. सरकारला धोका नसल्याचे शिंदे सेना व भाजपचे नेते सांगत आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरून हे सरकार कोसळेल, असा दावा उद्धव सेना, काँग्रेसकडून केला जातोय. राष्ट्रवादीकडून मात्र सरकार पडणार नसल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकरांचे मात्र ‘राजकीय भूकंपा’चे दावे आहेत. सर्वपक्षीय नेते ‘ज्योतिषी’ बनले असले तरी राज्याचे राजकीय भविष्य काय, याचे उत्तर कोर्टाच्या निकालातच दडले आहे.
उद्धव सेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत म्हणाले, ‘या सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. त्यावर सही कुणी करायची हे ठरलं आहे. हे सरकार फेब्रुवारीत कोसळणार हे मी सांगितले होते, पण कोर्टाचा निकाल लांबला. पण १५ दिवसांत सरकार कोसळणार हे नक्की.’ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, ‘जर शिंदेंसह १६ आमदारांच्या विरोधात कोर्टाचा निकाल गेला तर शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाईल. त्यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री येईल. पण युतीकडे बहुमत असल्यामुळे त्यांच्या सरकारला कोणताही धोका असेल असे मला तरी वाटत नाही.’
अजित पवार म्हणाले, ‘सध्या भाजपकडे अपक्षांसह ११५ तर शिंदे गटाकडे त्यांचे ४० व अपक्ष १० असे ५० आमदार आहेत. एकूण १६५ चे बहुमत या सरकारकडे आहे. त्यापैकी समजा १६ अपात्र ठरले तरी १४९ कायम राहतील. बहुमतासाठी सरकारला १४५ आमदारांची गरज आहे. म्हणून या सरकारला धोका नाही.’