पाचोरा : प्रतिनिधी
जिल्ह्याचे राजकारण परळीत मुंडे भाऊ बहिणीनंतर आता पाचोऱ्यात आणखी एका आमदार भाऊ आणि बहिण राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. यात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा सहभाग होता. यात पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांचा देखील सहभाग होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर डॅमेज कंट्रोल चांगल्याच पद्धतीने ठाकरे गट करीत आहे. शिंदे गटाला आगामी निवडणूक आणि पदोपदी शह देण्यासाठी ठाकरे गट चाल खेळत असून जळगावातील पाचोऱ्यात काल एक चाल खेळून शिंदे गटाला झटका देण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून झाला. आता पुढे काय होते ते लवकरच कळेल पण एवढे मात्र खरे की, मुंडे बहिण भावानंतर एका आमदार भावाविरोधात बहिण ही पाचोऱ्यातून मैदानात उभे राहणार आहे.
काल उद्धव ठाकरेंची जळगावातील पाचोऱ्यात जंगी सभा झाली. या सभेने अनेकांचे डोळेही विस्फारले. आर. ओ. पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या पाचोऱ्यात ठाकरेंनी त्यांच्या पुतळ्याचे काल अनावरण केले. आर. ओ. पाटील शेतकऱ्यांसाठी कुटुंब होते असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आर. ओ. पाटील यांची मुलगी वैशाली सूर्यवंशी यांना थेट पाचोऱ्यातून उमेदवारीच जाहीर केली. त्यामुळे पाचोरा तालुक्याचे सध्याचे आमदार आणि आर. ओ. पाटील यांचे पुतणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना शह देण्याचा हा प्रयत्न आहे.
आर. ओ. पाटील पाचोऱ्यातून दोन टर्म आमदार होते. निर्मल सिड्सच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक समाजोपयोगी कार्य केले. त्यांचा मोठा जनाधार तिथे आहे. त्याचा फायदा त्यांचेच पुतणे व आमदार किशोर पाटील यांना झाला होता. परंतु, आता शिवसेनेतून किशोर पाटील यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. ते सद्यस्थितीत शिंदे गटात आहेत.
ठाकरे गटात आर. ओ. पाटील यांची मुलगी वैशाली सूर्यवंशी या आहेत. त्या पाचोऱ्यातून भावी आमदार असतील असे भाकीत वर्तवले जात आहे. यातच उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत त्यांच्या मागे उभे राहा असे शिवसैनिकांना स्पष्ट सांगितले त्यामुळे त्या आगामी विधानसभा निवडणुकीत पाचोऱ्यातून उमेदवार असतील हेही स्पष्ट झाले आहे.