मुंबई : वृत्तसंस्था
सामान्यपणे फळं-भाज्या, मांस किंवा असे आणखी काही पदार्थ जे आपण स्वच्छ करूनच खातो. पण असंच चिकन स्वच्छ करणं एका व्यक्तीला मात्र महागात पडलं आहे. या व्यक्तीने अशा पद्धतीने चिकन स्वच्छ केलं की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. आता प्रत्येक जण चिकन स्वच्छ करतो. मग चिकन स्वच्छ करणं गुन्हा आहे का?
चिकन स्वच्छ करू नये का? त्यामुळे काही धोका आहे का? चिकन स्वच्छ केल्याने या व्यक्तीला पोलिसांनी अटक का केली? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील.
हे प्रकरण आहे दादरा आणि नगर हवेलीच्या सिल्वासा शहरातील. पोल्ट्री फार्मच्या एका कामगाराने चिकन स्वच्छ केलं. पण त्याने ज्या पद्धतीने ते स्वच्छ केलं ती पद्धत मात्र चुकीची होती. त्यामुळेच त्या व्यक्तीला अटक झाली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती चिकन साफ करताना दिसते आहे. पण तुम्ही नीट पाहिला तर या व्यक्तीच्या हातात चिकनसह तिरंगाही दिसत आहे. ही व्यक्ती त्याच तिरंग्याने चिकन साफ करते आहे. हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे.
त्यामुळेच या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 च्या कलम 2 अंतर्गत त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ज्या कायद्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे, त्या कायद्यात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज जाळणे, फाडणे, ठेचणे किंवा कोणत्याही प्रकारची हानी करणे हा गुन्हा मानला जातो. ती व्यक्ती दोषी आढळल्यास तिला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि दंडही होऊ शकतो.