मुंबई : वृत्तसंस्था
विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शेवटी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र तरी देखील चर्चा सुरूच आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाचं शिबीर पार पडलं, या शिबीरात सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचं नाव नव्हतं. तसेच आता कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी बनवण्यात आली आहे, त्यामधून देखील अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. स्टार प्रचारकाच्या यादीतून नाव वगळलं काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला. या धक्क्यातून सावरत पक्षाने कर्नाटक विधासभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीकडून 40 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीने कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारकाची यादी देखील जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये अजित पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाहीये. या यादीमध्ये राष्ट्रवादीकडून 15 जणांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, शिवाजीराव गरजे, क्लाइड क्रास्टो आणि आर हरी यांच्यासह इतर जणांचा समावेश आहे. मात्र या यादीतून अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे. शिबीराला अनुपस्थिती दरम्यान राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाच्या शिबीराला देखील अजित पवार अनुपस्थित होते. याबाबत त्यांना विचारले असता माझा पुणे दौरा नियोजित होता. त्यामुळे मी तिकडे गेलो नाही. उगाच शंका, कुशंका काढू नका असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता स्टार प्रचारकाच्या यादीतूनही नाव वगळण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.