पुणे : वृत्तसंस्था
पुण्यात झालेल्या प्रकट मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘फायरब्रँड’ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी ‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत प्रथमच आपली महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली. ‘जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार’ असे दोन दिवसांपूर्वी ठासून सांगणाऱ्या अजितदादांनी आता मात्र “भविष्यात आपण सत्तेसाठी काँग्रेस, उद्धव सेनेप्रमाणेच भाजपसोबतही जाऊ शकतो. पण मुख्यमंत्रिपदाबाबत आता तडजोड करणार नाही,’ असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचे आकर्षण नाही. मुख्यमंत्रिपदावर मात्र आम्ही २०२४ मध्येच काय, आजही दावा करू शकतो. आधी आपण ‘सेक्युलर’बाबत बोलत होतो. पण २०१९ मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी सगळ्यांना फाटा देत सरकार आणले. तेव्हा काही मुद्दे बाजूला ठेवले होते. भाजपशी युतीसाठी दबाव नसल्याचे दादा म्हणाले. पण संधी आल्यास सेक्युलरिझमचा अडसर ठरणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. माेदींचा करिष्मा २०१४ व २०१९ मध्ये चालला. म्हणून १९८४ नंतर प्रथमच देशात दोनदा स्पष्ट बहुमताने त्यांचे सरकार आले. उद्या असा आणखी एखादा नेता उदयास येऊ शकतो.
सीएम पृथ्वीराज चव्हाण व उद्धव ठाकरेंना आमदारकीचा अनुभव नव्हता. मी दोघांसोबतही उपमुख्यमंत्रिपदी काम केले. ठाकरेंसोबत आनंदाने पण चव्हाणांसोबत नाइलाजाने मला काम करावे लागले. पुतण्या अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणीचे संकेत दिले असले तरी त्यांचे काका व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मुंबईतील मेळाव्यात केंद्र व राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. या भूमिकेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेला एक प्रकारे पूर्णविरामच दिला आहे.