जळगाव : प्रतिनिधी
गेल्या आठदिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता या राजकारणावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, पक्ष फुटतोय असे कोण म्हणेल. शरद पवारांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार. ते मोठे नेते आहेत. असं म्हटले जाते की शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध घडतं; हे मी म्हणू शकत नाही. ते मोठे व्यक्ती असून त्यांच्याबद्दल बोलणे उचित नाही, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वातावरणाबद्दलच्या प्रकरणावर प्रतिक्रीया देताना गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलत होते. राज्यात सुरू असलेल्या राजकीय भुकंपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की सध्या होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य आहे. भुकंप नव्हे तर महाभुकंप होईल; असे संकेतच त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की प्रत्येकजण आपले भवितव्य पाहून निर्णय घेईल. यामुळे होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य असून राजकीय महाभुकंप होईल व अजित पवार हे भाजपमध्ये जाणे अटळ असल्याचे पाटील यांनी सांगितले. यापुढे राज्याचे चित्र वेगळं असेल. यापुढे येणारा काळ भाजपा शिवसेनेचा असेल; असेही त्यांनी स्पष्ट केले.