जळगाव : प्रतिनिधी
शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. रात्री नव्हे तर आता भरदिवसा घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी भरदिवसा शहरातील चित्रा चौक आणि मणियार सुपर शॉपीसमोर उभ्या असलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी पैशांच्या बॅगा लांबविल्याच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांचा उरलासुरला धाक संपल्याची प्रचीती जळगावकरांना येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील जितेंद्र शालिग्राम भदाणे यांचा गावातच खते व बी-बियाणे विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास भदाणे हे त्यांचा मित्र गणेश नवल पाटील (रा. वडगाव, ता. जळगाव) यांच्यासोबत (एमएच. १८. बीसी ०२५७) क्रमांकाच्या कारने जामनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास चित्रा चौकातील रिक्षा स्टॉपजवळ कार पार्क करून जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले. परत आल्यानंतर कारच्या मागच्या सीटवर १० हजार रुपये ठेवलेली बॅग दिसून आली नाही. याप्रकरणी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील अमोल कारभारी पाटील हा तरुण सोमवारी सकाळी एमएच.४८. पी. १७१० क्रमांकाच्या कारने बहिणीच्या वैद्यकीय तपासणीसाठी जळगावात आला होता. दीड ‘वाजेच्या सुमारास ते ड्रायफ्रूट घेण्यासाठी स्टेडियम परिसरातील दुकानामध्ये आले होते. याठिकाणी त्यांच्या कारची मागची काच फोडलेली दिसून आली, तर मागच्या सीटवर ४५ हजार रुपयांची रोकड, २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि मोबाइल असलेली बॅग व दुसरी महत्त्वाचे कागदपत्रे असलेली बॅग गायब झालेली दिसून आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.