मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. केवळ अमित शहा यांच्या सोयीसाठी भरदुपारी कार्यक्रम ठेवण्यात आला, असे दिसत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भरदुपारी हा कार्यक्रम ठेवण्यात आला. अप्पासाहेबांच्या लाखो अनुयायांची सोय न पाहता कार्यक्रमासाठी अमित शहांच्या सोयीची वेळ पाहीली. संध्याकाळी हा कार्यक्रम घेतला असता तर दुर्घटना टळली असती. सोहळ्यात सर्व व्हीआयपी छत्राखाली तर अनुयायी तळपत्या उन्हाखाली असे चित्र होते.
संजय राऊत म्हणाले, या दुर्घटनेवरुन आम्हाला कोणतीही टीका करायची नाही. आम्हीदेखील अप्पासाहेब व त्यांच्या मानवतेच्या सेवेला, कार्याला मानतो. सोहळ्यात उन्हामुळे त्यांच्या अनुयायामुळे जो काही त्रास झाला तो अतिशय दु:खद आहे. महाराष्ट्राला चटका लावणारी, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर राजकीय मंच सजला होता. तेथे लाखो अनुयायी केवळ अप्पासाहेबांसाठी आले होते. ते अमित शहा किंवा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना पाहण्यासाठी आले नव्हते. मात्र, लाखो भक्तांची व्यवस्था पाहण्यापेक्षा राजकारण्यांनी आपली राजकीय व्यवस्था पाहीली. भर उन्हात आटोपशीर कार्यक्रम घ्यायलला हवा होता. मात्र, राजकारण्यांनी भक्तांचा अंत पाहीला. संजय राऊत म्हणाले, या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. ही मागणी चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही. सरकारकडे कार्यक्रमाच्या आखणीसाठी अनेक तज्ज्ञ असतात. तरीही लाखो अनुयायांना तळपत्या उन्हात बसवले गेले. तो कार्यक्रम किती लांबवायचा, हे समजायला हवे होते.