जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पवन नगर येथील महिलेला घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे महागात पडले. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या घरातून मंगलपोत व दोन मोबाइल असा एकूण ८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पवन नगर येथे आशा सुनील सावकारे ही महिला कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरुवारी घराचा दरवाजा उघडा ठेवून ते घरामध्ये झोपले होते. मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून सोन्याची पोत आणि दोन मोबाइल असा एकूण ८ हजार ५०० किमतीचा ऐवज चोरून नेला.