जळगाव : प्रतिनिधी
धावत्या रेल्वेतून म्हसावद ते बोरनार रेल्वे लाइनवर पडून शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून नातेवाइकांना ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शुक्रवारी सकाळी म्हसावद ते बोरनार अप रेल्वे लाइनवरील खांबा क्रमांक ३९५/२४-२२ दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला. ही घटना स्टेशन प्रबंधकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाची अंगझडती घेतली, मात्र ओळख पटेल असे काहीही मिळून आलेले नाही. अखेर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.