जळगाव : प्रतिनिधी
सातबारा उतार्यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागून सुट्टीच्या दिवशी ती तलाठी कार्यालयात स्वीकारताना लाचखोर तलाठ्यासह कोतवालाला जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता रंगेहाथ अटक करताच महसूल विभागात लाचखोर हादरले आहेत. ही कारवाई भडगाव तालुक्यातील बु.॥ तलाठी कार्यालयात करण्यात आली. तलाठी सलीम तडवी व कोतवाल कविता सोनवणे अशी लाचखोरांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भोरटेकच्या तक्रारदाराची वडिलोपार्जित जमीन असून सातबारा उतार्यावर वारसांची नाव लावण्यासाठी आरोपी तलाठ्याने प्रकरण स्वीकारताना एक हजार रुपये लाच घेतली मात्र त्यावर त्यांची भूक भागली नाही व त्यांनी पुन्हा पंधराशे रुपयांची लाच कोतवालासोबत मागितली. तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय सुटी असलीतरी शासकीय कामे करण्यासाठी तलाठी कार्यालयात आलेल्या दोघा लाचखोरांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांनी हा सापळा यशस्वी केला.