पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील तालुक्यातील खेडीढोक येथील माहेर असलेल्या एका २२ वर्षीय विवाहितेचा दोन लाखांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विवाहितेचे गुजरात येथील उधना हे सासर आहे.
मिळालेली माहिती अशी की, डिसेंबर २०१८मध्ये मदनपुरा लिंबायत, उधना (गुजरात) येथे विकी राजेंद्र राजपूत याच्याशी विवाह झाला. घरात पती, सासू शोभा राजेंद्र राजपूत, दीर महेंद्र राजेंद्र राजपूत, दिरानी प्रियंका महेंद्र राजपूत असे एकत्र राहत होते. पती विकी हा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. व्यवसाय वाढवण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे, म्हणून वेळोवेळी मानसिक, शारीरिक छळ करून शिवीगाळ व मारहाण केली. वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने पैसे आणण्यास नकार दिल्यावर धमकी दिली. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास नाईक प्रवीण पाटील हे करीत आहेत.