मुंबई : वृत्तसंस्था
फेब्रुवारीअखेरपासून कोरोना झपाटय़ाने वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्येचा अक्षरशः गुणाकार सुरू आहे. संपूर्ण जानेवारीत 128, फेब्रुवारीत 122 रुग्ण आढळले असताना मार्चमध्ये तेरा पट वाढ होऊन तब्बल 1719 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांत 1941 रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ कायम राहणार असून मे महिन्यात सध्याच्या रुग्णसंख्येच्या दहा पट रुग्णवाढ होणार असल्याचा धोका पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पालिकेने खासगी रुग्णालयांसह आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि तत्कालीन राज्य सरकारच्या नियोजनामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले. यानंतर जानेवारी 2023 मध्ये दैनंदिन रुग्णसंख्या एक आकडी नोंद होऊ लागली होती. मात्र मार्चअखेरीपासून मुंबईत पुन्हा एकदा रुग्णवाढ सुरू झाली आहे. गेल्या तीन लाटांमध्ये मार्चनंतर वाढलेल्या रुग्णसंख्येची स्थिती पाहता आणि आरोग्यतज्ञांच्या इशाऱ्यानुसार सध्याच्या रुग्णवाढीच्या तुलनेत आगामी काळात दिवसाला आणखी दहा पटीने रुग्णवाढ होईल, अशा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. म्हणजेच दिवसाला चार ते पाच हजार रुग्ण आढळू शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन दिवस कोरोना तयारीबाबत सरकारी, पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये ‘मॉकड्रील’ घेण्यात आले.
मुंबईत पालिका, सरकारी आणि 36 खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या मॉकड्रीलनुसार 2124 आयसोलेशन बेड, 1381 ऑक्सिजन बेड, 747 आयसीयू, 697 व्हेंटिलेटर असे एकूण 4709 बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. तर 3315 डॉक्टर्स, 5831 नर्स, 2284 आरोग्य कर्मचारी अशी एकूण 11,430 आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम तयार आहे. एकटय़ा ‘सेव्हन हिल्स’मध्ये 1850 बेड आहेत. 196 रुग्णवाहिका तैनात आहेत. तर 34 हॉस्पिटल आणि 49 लॅबमध्ये कोरोना चाचण्यांची व्यवस्था आहे.
मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच रुग्णवाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी निर्णायक बैठक घेऊन चाचण्या वाढवण्याचे निर्देश राज्यांसह स्थानिक प्रशासनांना मागील आठवडय़ात दिले. पालिकेने यानंतर दररोज दहा हजार चाचण्या करण्याची क्षमता असल्याचेही सांगितले, मात्र अद्याप दोन हजारांहून कमी चाचण्या होत आहेत. मुंबईत चाचण्या वाढवल्यास खरा प्रकोप समोर येईल, असे आरोग्यतज्ञांकडून सांगण्यात येत आहे.