जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या मेहरुण तलाव परीसरात घरफोडीच्या उद्देशाने आलेल्या कुविख्यात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयीतांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण तलाव परीसरात वासुदेव महाजन यांच्या बंगल्याच्या समोर असलेल्या गल्लीत अंधाराचा फायदा घेत चोरी आणि घरपोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी सोमवार, 10 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता अटक केली. संशयित विशाल मुरलीधर दाभाडे, दीपक शांताराम रेणुके व गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी अशी अटकेतील तीन संशयित आरोपींची नावे आहेत. अटकेतील गुरुजीतसिंग बावरी यांच्या विरोधात आत्तापर्यंत वेगवेगळे 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे तर विशाल दाभाडे याला जिल्हा पोलिसांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तीनही संशयित आरोपींविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यासोबत असलेले घरफोडी करण्याचे साहित्य सुरा व स्क्रू ड्रायव्हर या वस्तू हस्तगत करण्यात आल्या.
ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलीस नाईक इम्रान सय्यद, मंदार पाटील, चेतन सोनवणे, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, संदीप धनगर यांनी केली. संशयीतांना न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती जे. एस. केळकर यांनी तिघांची कारागृहात रवानगी केली. सरकार पक्षातर्फे अॅड.स्वाती निकम यांनी काम पाहिले.