मुंबई : वृत्तसंस्था
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते कि, बाबरी पाडली तेव्हा, एकही शिवसैनिक नव्हता, असे वक्तव्य करून पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, हा विषय गंभीर आहे. काल गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाच्या भरकटलेल्या भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी बाबरी प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून ही जबाबदारी झटकली होती. हे काम शिवसेनेचे असल्याचे म्हटले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक-एक जण बिळातून बाहेर येतायत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी, पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो, पण पंतप्रधानांची हिंमत झाली नाही. शेवटी कोर्टाने निकाल दिला. मिंधेंना बाळासाहेबांचे, शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरू नये.