जळगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गर्भवती केले आणि होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार देणाऱ्या धरणगाव तालुक्यातील नारणे येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नारणे येथील मूळ रहिवासी शरद सखाराम भिल (२४) हा चहार्डी, ता. चोपडा येथे ट्रॅक्टरचालक म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न झालेले होते. मात्र पत्नी आपल्या मुलांसह माहेरी निघून गेलेली होती. म्हणून त्याने चहार्डी येथील बकऱ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलीचा २०१९ ते २०२० दरम्यान रोज पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालायचा आणि तिला लग्नाचे आमिष दाखवायचा. तिच्याशी जंगलात, पाटचारीजवळ बळजबरीने शारीरिक संबंध करत असे. मुलगी विरोध करीत असताना तिला तुझ्याशी लग्न करेल, असे सांगत असे. या प्रकारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. मात्र आरोपी शरद याने जन्माला आलेल्या बाळाला स्वीकारण्यास नकार दिला आणि पीडित तरुणीशी लग्न करण्यासही नकार दिल्याने चोपडा शहर पोलिस स्टेशनला १९ जून २०२० रोजी पोक्सो कायद्याप्रमाणे तसेच भादंवि कलम ३७६ प्रमाणे बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड. आर. बी. चौधरी, अॅड. किशोर बागुल यांनी पीडिता, पीडितेची आई, डॉक्टर असे एकूण नऊ साक्षीदार तपासले. न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी आरोपीला पोक्सो कायदा कलम ५ ज (२) व कलम ४प्रमाणे प्रत्येकी बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. भादंवि कलम ३६३ प्रमाणे सात वर्षांची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पो.कॉ.उदयसिंग साळुंखे, पो. कॉ. हिरालाल पाटील, नितीन कापडणे यांनी काम पाहिले.