अकोला : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरावरील टिन शेडवर झाड पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले.
पारस येथील महात्मा फुले विद्यालयाजवळ समर्थ बाबुजी महाराज संस्थानात रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी आरती झाल्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही जण सुरक्षेसाठी या परिसरातील शेडखाली थांबले. मात्र या शेडवर कडुनिंबाचे मोठे झाड कोसळल्याने त्यात उभे असलेले सुमारे 50 च्या वर भाविक-ग्रामस्थ अडकले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बाळापूर-पारस मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. जखमींना रुग्णवाहिका व अन्य वाहनांनी रुग्णालयात हलवण्यात आले. ग्रामस्थ, पोलिस व अन्य सरकारी यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी बचावकार्यासाठी सरसावले. अतुल आसरे (वय 32 वर्ष, बाभूळगाव जि. अकोला), विश्वनाथ तायडे (वय 35 वर्ष, सोनखेड), पार्वताबाई महादेव सुशील (वय 65 वर्ष आलेगाव बाजार), भास्कर आंबीलकर (वय 60 वर्ष अकोला), उमा महेंद्र खारोडे (वय 50 वर्ष, भुसावळ) अशी मृत व्यक्तींची नावं असून काहींचे अद्याप नावे कळू शकले नाहीत. तरीही यातील मृतकांची अद्याप पर्यंत ओळख पटली नसून दोन्ही पुरुष असून त्यांची वय 35 आणि 45 अशी आहे. बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जुंबळे यांनी ही माहिती दिली आहे.