जळगाव : प्रतिनिधी
पाण्याच्या मोटारीची वायर काढल्याच्या शुल्लक कारणावरून शेजारच्यांनी बाप व मुलाला मारहाण केल्याची घटना दि. ८ शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास समतानगर येथे घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील समतानगर येथे शंकर शालिक सोनवणे (३०) हे आई-वडील, पत्नी व बहिणीसह वास्तव्यास आहेत. शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्यामुळे सोनवणे कुटुंबीय पाणी भरत होते. त्यावेळी शंकर यांनी एकत्रित असलेल्या पाण्याच्या मोटारीची वायर काढल्यामुळे मोटार बंद झाली. याचा राग येऊन शेजारच्यांनी सोनवणे कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शंकर यांना काठीने मारहाण केली. भांडण सोडविण्यास आलेले त्यांचे वडील शालिक सोनवणे यांनासुद्धा मारहाण करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.