धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव शहरातील वैदूवाडा येथील मटण मार्केटची दुर्गंधी कायम स्वरुपी घालवून, गटार लाईन बंदिस्त करण्याबाबतचे निवेदन आज वैदू समाज विकास संस्थेच्या माध्यमातून तहसीलदार यांना देण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हा अध्यक्ष दिपक सुरेश सोनवणे यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि, नगरपरिषद धरणगावच्या मालकी हक्काची वैदूवाडा येथे बोकड-बकरी मटणाचे सहा व्यवसायिक गाळे चालू असून, गेल्या कित्येक महिन्यांपासून त्या ठिकाणाची स्वच्छता करण्यासाठी येणारे पाण्याचे टँकर बंद झाले आहेत. आता त्या ठिकाणी कापले जाणारे पशुंची सर्व घाण सहा गाळ्यांचे व्यावसायिक फक्त एक-दोन बादल्या भर पाण्यात सर्व स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अर्धवट स्वच्छतेमुळे तेथे रक्त, पोटातील घाण, कातडांवरील पातळ मांस आणि केस हे जेमतेम वैदू वाडातील गटार लाईन पर्यंत पोचते. कापलेल्या ठिकाणांपासून गटार पर्यत घोंघावणारी माशी- मच्छर- व गटारीत आलेल्या वरील सर्व घाण, मल-मूत्र, दुर्गंधी मुळे त्या परिसरातील नागरिकांची व प्रामुख्याने लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही अस्वस्थ करणारी बाब असून नाक दाबून त्या परिस्थितीत राहावे लागते हे आमच्या मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाही, या रोजच्या अस्वच्छतेमुळे व दुर्गंधीने परिसरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
या बाबतीत लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यांची जाणीव जबाबदारी नगरपरिषद च्या लक्षात आणून दिली आहे, तसेच यांची एक प्रत मुख्यधिकारी, जिल्हा अधिकारी व पालकमंत्री यांना ही दिले जाईल. होणारी दुर्गंधी कायम स्वरुपी घालवून सर्व परिसर स्वच्छ, सुंदर असावा म्हणून संबंधित अधिकारी-सेवक- कर्मचारी यांनी त्वरित लक्ष द्यावे व आहे त्याच गटार लाईन ला बंदिस्त करून आम्हाला वरील त्रासापासून सुटका करावी.