जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील १२ वर्षीय मुलाला विषबाधा होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदित्य योगेश माचरे असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी कि, आई व दोन बहिणींसोबत आदित्य माचरे हा वास्तव्याला होतो. वडीलांचे निधन झाल्याने त्याची आई रिना माचरे ह्या मोलमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार दि.६ एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने आदित्य हा त्याचा मामा जितू गारूंगे आणि मामी आरती गारूंगे यांच्यासोबत दुचाकीने एका ठिकाणी हनुमान मदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेतल्यानंतर परत येत असतांना कोळनाव्ही येथील सप्तश्रुंगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी चढत असतांना आदित्यला अचानक उलट्या झाल्या. आदित्याला मामाने तातडीने खासगी वाहनाद्वारे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचारासाठी घेवून आले. जेवणानंतर उन्हात फिरत असतांना त्याला विषबाधा झाल्याने त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आदित्य हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने बहिणींसह आईचा मन हेलावणारा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणत होता. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदित्यच्या पश्चात आई रिना, मोठी बहिण भूमी आणि लहान बहिण गौरी असा परिवार आहे.