मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. अजित पवार सकाळी पुण्यात होते. अजित पवार यांनी पुण्यातले कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट केला आहे आणि “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं कॅप्शन अंजली दमानिया यांनी दिलं आहे. त्यामुळे अजितदादा नॉट रिचेबल अशा बातम्यांना आणि चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.
अजित पवार यांच्यासह नॉट रिचेबल असलेले सात आमदार कोण हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा बंड होणार का? अशा सगळ्या चर्चाही सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जात आहेत त्याच्या बरोबर २४ तास आधी अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अंजली दमानिया यांच्या प्रमाणेच इतर अनेकांनी अजित पवार नॉट रिचेबल आहेत अशी ट्वीट केली आहेत. एवढंच नाही तर अनेकांनी अजित पवारांचा उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभं राहून डोळा मारतानाचा व्हिडीओही ट्वीट केला आहे.
किळसवाणी राजकारण
मी पुन्हा येईन pic.twitter.com/mGY1k2720i
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 7, 2023
मागच्या वर्षी जून महिन्याच्या २१ तारखेला एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कसं कोसळलं? शिंदे फडणवीस सरकार कसं स्थापन झालं? हे महाराष्ट्राने पाहिलं आहेच. अशात आता अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळणार का? आणि तो काय असणार याची चर्चा राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे.