पुणे : वृत्तसंस्था
राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी गजाआड केले आहे. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना अशी धमकी देण्यात आली होती. इम्रान शेख असं आरोपीचे नाव आहे. त्यानेच महेश लांडगे, अविनाश बागवे आणि वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे. इम्रान शेख याला घोरपडी परिसरातून अटक केली.
मागील दिवसांपासून पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येत होते. या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी वेगाने तपास सुरु करून आरोपीला अटक केली. अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज वसंत मोरे यांच्या मुलास आला होता. हिच मुलगी त्याची प्रेयसी असल्याची शक्यता आहे.
आमदार महेश लांडगे यांना परिवर्तन हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून 30 लाखाची खंडणी दे अन्यथा जीवाला धोका आहे, अशा आशयाचा मेसेज पाठवण्यात आला आहे. त्या मॅसेजमध्ये बँक डिटेल देखील देण्यात आले होते. संबंधित बँक खात्यात पैसे जमा करण्याची सूचना देण्यात आली होती. तसेच इतर रक्कम ही एका ठिकाणी गाडीत ठेवण्यास सांगण्यात आले होते.
पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले होते. त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी देत लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली होती.
पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘इलेक्शनच्या भानगडीत पडू नकोस. अन्यथा गोळ्या घालून मारू’ अशी धमकी व्हाट्सअप मेसेज करून देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.