अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील नवल भाऊ कृषी महाविद्यालय येथील बोगस प्राध्यापक व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील जबाबदार सक्षम अधिकारी यांचे वर फौजदारी कारवाई करण्याचे राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे लेखी तक्रार केली आहे.
सविस्तर वृत्त असे की दिनांक २९ मे २०१७ पासून प्रा. शिवाजीराव बाबुराव शिंदे यांचे कडे कुठल्याही प्रकारची कृषी शिक्षणाची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण नसताना माननीय अध्यक्ष विजय नवल पाटील नवलभाऊ प्रतिष्ठान नवल नगर व तत्कालीन प्राचार्य डॉ. ई. एन. पाटील यांनी प्राध्यापक शिंदे यांची प्राध्यापक पदावर बेकायदेशीरपणे नियुक्ती नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर येथे आपल्या हुकूमशाही व मनमानी पद्धतीने केली.
प्राध्यापक शिंदे यांचा सेवाकाळ 16 महिन्याचा आहे . त्यात त्यांनी धुळे कृषी महाविद्यालय येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे लेखी पेपर तपासणी केंद्र, कृषी महाविद्यालय धुळे. येथे जाऊन बीएससी ऍग्रीच्या कृषी विद्या या विषयाचे 322 लेखी पेपरांचे मूल्यमापन केले. व कृषी महाविद्यालय शहादा येथे जाऊन 200 विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेचे परीक्षक म्हणून कर्तव्य बजावले तसेच श्रीमती सुप्रिया कदम अॅग्री इंजिनिअरिंगच्या सहाय्यक प्राध्यापिका यांनी डॉ. एकनाथ एन पाटील यांचे सांगणे वरून कृषी विद्या या विषयाचे 117 लेखी पेपरांचे मूल्यमापन केले. अशा प्रकारे एकूण 639 विद्यार्थ्यांचे बोगस प्राध्यापकाकडून मूल्यमापन करण्यात आलेले आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची व बेकायदेशीर आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचेकडे सदर तक्रार दोन ते तीन वेळेस देऊन देखील कृषी विद्यापीठ प्रशासन धातूरमातूर चौकशी करून प्रकरण थांबविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु सदर तक्रार माननीय कृषी कॅबिनेट मंत्री यांना दिल्यावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रशासनाला जाग येऊन त्यांनी तीन सदस्य समिती गठित करून दिनांक 1/06/2022 रोजी चौकशी करून दिनांक 14/06/2022 रोजी चौकशी अहवाल माननीय कुलसचिव प्रमोद लहाळे यांच्याकडे सुपूर्त केला, परंतु मा. कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी सदरील प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून देखील काना डोळा करत आपल्या कर्तव्यात कसूर करून यापुढे असे करू नये, असे संस्थेला सांगितले व भविष्यात असे केल्यास कृषी विद्यापीठ कायद्या अंतर्गत कारवाई करू असे म्हटले आहे.
सदर तीन अधिकाऱ्यांच्या गठीत चौकशी समितीत डॉ. संजीव शामराव पाटील अध्यक्ष डॉ. गिरीश भगवान चौधरी, सदस्य, प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ तेलबिया संशोधन केंद्र जळगाव व श्री राजाराम देवराम महाले अधिदान अधिकारी कृषी महाविद्यालय धुळे सचिव चौकशी समिती यांनी श्री शिवाजीराव शिंदे यांचे कुठल्याही प्रकारचे कृषी शिक्षणाचे कागदपत्र संस्थेकडे आढळून आलेले नाहीत असा अहवाल दिलेला आहे. परंतु प्राध्यापक शिंदे यांची बेकायदेशीर नेमणूक करणारे तत्कालीन प्राचार्य डॉ. एकनाथ एन पाटील व प्राध्यापक शिंदे सदर चौकशी समोर हजर करण्यात आलेले नाहीत त्यामुळे सदर चौकशी ही अपूर्ण आहे व चौकशी समितीने प्राध्यापक शिंदे यांचे कडे कुठल्याही प्रकारचे कृषी शिक्षणाचे कागदपत्र आढळून आले नाहीत असा अहवाल माननीय प्रमोद लहाळे कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडे दिल्यावर त्यांनी सदर प्रकरणी सोयीस्करपणे कानाडोळा केल्यामुळे व कृषी शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत असल्याकारणाने, या सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी प्राध्यापक गिरीष सुखदेव पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे.