मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मार्च महिना संपला असतांना देखील अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात सर्वत्र पाऊस झाला. या पावसात शेतीचे मोठे नुकसान झाले. आता एप्रिल महिन्यात पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. यासंदर्भातील ट्विट ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसालीकर यांनी केलेय. या अवकाळी पावसामुळे शेतीसमोर पुन्हा संकट असणार आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नाही.
४ ते ७ एप्रिल दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्मिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये ६ आणि ७ एप्रिल रोजी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्येही ६ आणि ७ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरमध्ये ४ आणि ५ एप्रिल रोजी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
ला- नीनाचा प्रभाव
देशात पावसासाठी ला नीना ही स्थिती चांगली आहे. जून ते ऑगस्ट पर्यंत ला नीना सकारत्मक आहे. मात्र मान्सूनचा अंदाज इतक्या लवकर देणे कठीण असल्याचे डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. हा अंदाज आम्ही 15 एप्रिल रोजी जाहीर करणार आहोत. साधारणपणे मार्चमध्ये पाऊस होत नाही. मेच्या अखेरीस अवकाळी पाऊस पडतो. पण यंदा मार्चमध्येच पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर-पश्चिमेकडील काही राज्यातही पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीत पाऊस झाला. चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि राजस्थानातही मोठा पाऊस झाला. या ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.