नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुन्हा एकदा देशात कोरोनाचा कहर पहायला मिळतोय. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 (COVID-19) चे 3,038 नवीन रुग्ण आढळले आहेत.
सध्या देशात कोविडचे 21,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोविडमुळं 7 मृत्यूची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये कोरोनामुळं 2, उत्तराखंडमध्ये 1, महाराष्ट्रात 1 (Maharashtra), जम्मूमध्ये 1 आणि दिल्लीत 2 मृत्यूची नोंद झाली आहे.
आज (मंगळवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड प्रकरणांची एकूण संख्या 4.47 कोटी (4,47,29,284) वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय प्रकरणं एकूण संक्रमणांपैकी 0.05 टक्के आहेत. कोरोना आजारातून बरं झालेल्या रुग्णांची संख्या 44177204 आहे. तर, कोविड रुग्णांचा मृत्यू दर 1.19 नोंदवला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात कोविडच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी व्यक्त केलं.