अमळनेर : प्रतिनिधी
बनावट ट्रक क्रमांकासह बनावट ओळखपत्र वापरून बनवाबनवी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाने प्रेयसीला केलेला कॉल त्यांना गजाआड करण्यास पुरेसा ठरला. नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी (३१) आणि हारुन रशीद साजिदखान (३८, दोघे रा. जयपूर) अशी या बनवाबनवी करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी जोधपूर येथे विकलेल्या १८ लाख रुपयांच्या ३२५ साबण पेट्या जप्त केल्या आहेत. राजस्थान येथील सुनील ओमप्रकाश भार्गव याने आपले नाव कैलास गुजर सांगून अमळनेर येथील कंपनीतून साबणाच्या ५६ लाख रुपये किमतीच्या पेट्या असलेला ट्रक भरला. त्यानंतर तो माल घेऊन गायब झाला होता. या गुन्ह्यातील मास्टर माइंड नरेंद्र स्वामी होता. स्वामी याने त्याचवेळी त्याच क्रमांकाचा ट्रक रावेर व इतर दोन ठिकाणांहून रवाना केले होते. त्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले होते. मात्र ज्या क्रमांकावरून चालक सुनील आधी बोलला त्याचे लोकेशन दुसरीकडेच येत होते. त्यामुळे एकाच क्रमांकाच्या वेगवेगळ्या गाड्या असल्याचा संशय आला.
त्यानंतर पोकॉ. नीलेश मोरे यांनी सिडीआर लोकेशनवरून स्वामीने २० सेकंद आपल्या प्रेयसीला कॉल केल्याचे शोधून काढले आणि मार्ग सापडला. प्रेयसीचा दुसरा संपर्क नंबर हुडकून काढण्यात आला परंतु तिने पोलिसाचा नंबर ब्लॉक केला. प्रेयसीचा बिकानेर येथील पत्ता शोधून माहिती काढण्यात आली तेंव्हा सुनील भार्गव याने कैलास गुजर हे नाव बदलले असल्याचे लक्षात आले. तो अनिल भार्गव आणि नरेंद्र स्वामी यांच्यासोबत मोठ्या चोऱ्या करत असल्याचे पोलिसांना समजले.
नीलेश मोरे यांनी सात दिवस आरोपीच्या घराबाहेर पहारा दिला पण उपयोग झाला नाही. शेवटी आरोपी स्वामी हा हैद्राबाद ते जयपूर रेल्वेने येणार असल्याची माहिती मिळाली. टी. सी. मदतीला धावला. माहिती मिळताच मोरे आरोपीच्या शेजारी जाऊन बसले. भिलवाडा स्टेशनवर तयार असलेल्या पथकाने स्वामीवर झडप घातली आणि त्याला पकडले. स्वामीने हारुन साजिदखान हा पण समाविष्ट असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.
यांनी केली कारवाई !
पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल भुसारे, भैयासाहेब देशमुख, हेकॉ. सुनील हटकर, कॉ. नीलेश मोरे, मिलिंद भामरे, उज्ज्वल पाटील यांच्या पथकासह शरद पाटील, श्रीराम पाटील, अमोल पाटील यांनी सहकार्य केले.