जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आकाशवाणी चौक परिसरात एकाने पोलीस असल्याची बतावणी करत, गांजा तपासण्याच्या बहाण्याने एका वृद्धाच्या बोटातील ५ ग्रॅमच्या अंगठी व १८ हजार रुपयांची रोकड लांबवित एका युवकाने वृद्धाला गंडविले आहे. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजता घडली असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील कस्तुरी सुपर शॉप मागे रघुनाथ बाबुराव अंबुसकर (वय. ६३) हे वृद्ध वास्तव्यास असून ते सेल्समन म्हणून नोकरी करतात. शनिवारी अंबुसकर हे दुपारी ४ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाकडून जात असताना, त्यांना एका तरुणाने थांबविले. तसेच आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यावर अंबुसकर यांनी युवकाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, त्या युवकाने शहरात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचे सांगत, आपण गांजा तपासणी करण्याची कारवाईसाठी स्पेशल ड्युटी करत असल्याचे त्या युवकाने सांगितले. त्यानंतर संबधित वृद्धाला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर त्या युवकाने हातचालाखी करीत रघुनाथ अंबुसकर यांच्या बोटात असलेली ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी व १८ हजारांची रोकड तरुणाने काढून घेतली. काही वेळानंतर हा प्रकार अंबुसकर यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार हे करीत आहे.