जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाने घोषित केलेला पहिला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार’ व विविध कार्य गौरव पुरस्कार आणि कवयित्री बहिणाबाई यांचेवरील व्याख्यानाचा कार्यक्रम बुधवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ विषाणू प्रादूर्भाव लक्षात घेऊन मर्यादित संख्येच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उर्वरित व्यक्तींकरिता दूरदृष्य प्रणाली व्दारा (ऑनलाईन पध्दतीने) आयोजित केला आहे.
विद्यापीठाच्या नामविस्ताराची घोषणा राज्य सरकारकडून दि.११ ऑगस्ट, २०१८ रोजी करण्यात आली. या वर्षी या नामविस्ताराला तीन वर्षे पुर्ण होत आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा केला जातो. हा कार्यक्रम बुधवार, दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सुरु होईल. विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुंनी व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी या वर्षापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार देण्यात यावा असा निर्णय घेतला. या वर्षीचा हा पुरस्कार, वर्डी शिवारात झालेल्या विमान अपघातात जखमी तरूणीसाठी अंगावरची साडी सोडून त्याची झोळी बनवून रूग्णवाहिकेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करून मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल वर्डी, ता. चोपडा येथील सौ. विमलबाई हिरामण भिल यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ११ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि साडी- चोळी असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या अपघातस्थळी मदत करणाऱ्या वर्डी येथील ग्रामस्थांचाही यावेळी सत्कार केला जाणार आहे. यावेळी प्रारंभी कवी कमलाकर देसले यांचे ‘प्रतिभा आणि प्रज्ञेचा चेहरा : बहिणाबाई चौधरी’ या विषयावर व्याख्यान होईल. तदनंतर विद्यापीठाकडून वर्ष २०१७-१८ आणि वर्ष २०१८-१९ चे उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यगौरव पुरस्कार तसेच संशोधनात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांनाही पुरस्कार दिले जाणार आहेत. कोरोनो काळात विद्यापीठात लसीकरण शिबीर व इतर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीमधील कर्मचाऱ्यांचाही यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण पाहण्यासाठी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे. सर्वांनी ऑनलाईनव्दारे कार्यक्रम पाहावा असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले आहे.