जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात नंदकिशोर शिंदे यांच्या मालकीच्या किराणा दुकानातून ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा माल चोरून त्याची परस्पर विक्री करणाऱ्या कामगाराला एमआयडीसी पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. विशाल शरद पाटील (२१, रा. मेहरूण) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव असून त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
शिंदे यांचे श्री समर्थ किराणा नावाचे दुकान आहे. या दुकानातील कामगार विशाल याने ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा माल चोरून त्याची परस्पर विक्री केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून एमआयडीसी पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्याला पुण्यातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सुधीर साळवे, इमरान सय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे आदींनी केली आहे. तर संशयित विशाल याच्याकडून ३० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.