यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील अट्रावल येथे बारागाड्यांवरून शुक्रवारी सायंकाळी झालेला वाद शनिवारी सकाळी ११ वाजता पुन्हा उफाळून आला. यात दोन गटात हाणामारी व नंतर दगडफेक झाली. यात महिला फौजदारासह १० जण जखमी झाले. १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
घटनेचे वृत्त कळतात येथील पोलिस पथक घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. अट्रावल येथे शुक्रवारी सायंकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता. त्यावर बसण्यावरून एका तरुणाशी वाद झाला होता. हा वाद शनिवारी सकाळी पुन्हा उफाळून आला. दोन्ही गटाकडून दगडफेक झाली. यात आठ ते दहा जण जखमी झाले. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. यात एका पोलिसासह फौजदार सुनीता कोळपकर ह्या जखमी झाल्या आहेत.
यावल पोलिसांसह फैजपूर, भुसावळ, जळगाव, सावदा, पोलिस व दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे किसन नजन पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी अट्रावल येथे तळ ठोकून आहेत. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, निळे निशान संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.