अन् सहाच्या सहा जागांवर दणदणीत विजय
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते अमरिशभाई पटेल याचं पुन्हा धुळ्यात वर्चस्व असल्याचं एकदा स्पष्ट झालं. शिरपूर पंचायतीच्या सहा गणांच्या सर्व जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे शिरपूरमध्ये अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व अधोरेखित झालं आहे.
धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत धुळ्यात एकूण 65 टक्के मतदान झाले. त्यात शिरपूर तालुक्यात 57.12 टक्के मतदान झाले होते. धुळ्यात प्रचंड मतदान झाले असले तरी शिरपूर येथील निकालांवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलं गेलं होतं.
पंचायत समितीच्या सहा गणांवर भाजप वर्चस्व कायम राखणार की महाविकास आघाडीच्या प्रयोगासमोर भाजप अपयशी ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अमरिशभाई पटेल यांच्या नियोजनामुळे भाजपने सहापैकी सहा जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अन्… धुळ्यात भाजपला बहुमत
जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान घेण्यात आले आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखली आहे.
काँग्रेस आव्हान देणार ?
भाजपला जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी अवघ्या दोन जागांची आवश्यकता आहे. असं असतानाही त्या जागाही महाविकास आघाडी भाजपला मिळू देणार नाही, असा ही दावा काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केलाय. एवढंच नव्हे तर ज्या अपक्षांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता ते देखील भाजपचा पाठिंबा काढून घेतील, असंही कुणाल पाटील यांनी म्हटलंय.