जळगाव : प्रतिनिधी
शहरातील भजे गल्लीमध्ये दारू पिऊन वाद घालणाऱ्या तरुणांना काही दिवसांपूर्वी जिल्हापेठ पोलिसांनी पोलिस ठाण्यात नेले होते. याचा राग मनात ठेवून त्या तरुणांनी मित्रांसोबत जेवण्यासाठी हॉटेलात आलेल्या गणेश मधुकर पाटील (३८) या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चॉपरने वार केल्याची घटना हॉटेल रिगल पॅलेसमध्ये मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एक संशयित अद्याप फरार आहे.
मिळालेली माहिती अशी कि, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस गणेश पाटील मंगळवारी रात्री त्यांचे मित्र मयूर गवळी व सीताराम पुरोहित यांच्यासोबत जेवणासाठी हॉटेल रिगल येथे गेले होते. समोरील टेबलावर बसलेले दोन जण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने तुम्ही पोलिस गाडीत आम्हाला पोलिस ठाण्यात घेऊन गेले होते, असे त्यांनी सांगितल्यावर पाटील यांनी त्यांना ओळखले. काही वेळानंतर त्या तरुणांनी शेजारच्या टेबलावर बसलेल्या समाधान बारी व परवेज शेख यांना पाण्याची बाटली मारून फेकली व शिवीगाळ, दमदाटी केली.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोबत असलेल्या लोकांनी गणेश पाटील यांची मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिल्यानंतर लागलीच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी संशयित कृष्णा नरेंद्र पिंगळे (२०, रा. रायसोनी नगर, जिजाऊ चौक), मयंक राजेंद्र चौधरी (२७. रा. गणेशवाडी), भावेश अनिल चौधरी (१९, रा. गणेश वाडी) यांना अटक केली तर त्यांच्यासोबत असलेला गोपाल नवल हा तेथून पसार झाला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



