चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील अडावदसह परिसरात सोमवारी रात्री येथील मुख्य रस्त्यावरील ४ ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे सकाळी उघडकीस आले. यात एक पतसंस्था असून २ मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश आहे. त्यापैकी कापड दुकानात मात्र किरकोळ चोरी झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या ६ महिन्यांपासून परिसरात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. शेतशिवारातून केबल, स्टार्टर याचबरोबर मोबाइल, मोटारसायकली आदी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात बऱ्याचदा किरकोळ चोऱ्यांच्या घटनांची नोंद करण्यात ग्रामस्थ पुढाकार घेत नाहीत. दरम्यान, सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी येथील एका पतसंस्थेचे लोखंडी गेटचे कुलूप तोडले. परंतु लोखंडी गेटच ते उघडू शकले नाहीत. पुढे त्याच रोडवरील २ मेडिकल स्टोअर्सचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला. तेथे असलेल्या एका कापड दुकानात मात्र हात साफ करण्यात चोरट्यांना यश आले. मात्र दुकानात चिल्लर व्यतिरिक्त काहीही नव्हते. याबाबत मात्र एकही तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.