जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नेहरू चौकात सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावर आलेल्या पक्षकाराकडे कागदपत्र घेण्यासाठी निघालेल्या अॅड. योगेश जालमसिंग पाटील (४५, रा. दादावाडी) यांच्या वाहनाला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील मुळचे तमगव्हाण येथील अॅड. योगेश पाटील हे कुटूंबासह दादावाडीत वास्तव्यास होते. सायंकाळी ते त्यांच्या शाहु महाराज कार्यालयात कॉम्प्लेक्समधील असताना रेल्वे स्थानकावर आलेल्या एका पक्षकाराचा त्यांना फोन आला म्हणून ते पक्षकाराकडील कागदपत्र घेण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने (एमएच. १९. सीई. ६५११) निघाले होते. कोर्ट चौकाकडून रेल्वे स्थानकाकडे जात असताना सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास नेहरू चौकात त्यांच्या दुचाकीला टॉवर चौकाकडे निघालेल्या भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात अॅड. योगेश पाटील यांना गंभीर दुखापत झाली.
नागरिकांनी तत्काळ दुचाकी बाजूला घेवून अॅड. योगेश पाटील यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिका- यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. पाटील यांच्या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. केतन ढार्केसह इतर वकील बंधुनी जिल्हा रुग्णालय गाठले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.