जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरूण परिसरातील गायत्रीनगरात दुसऱ्या मजल्यावरून पडून कैलास बाबूराव महाजन (४२, रा. नशिराबाद) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, नशिराबाद येथे आपल्या परिवारासह कैलास महाजन हे वास्तव्यास होते. उद्यानाचे काम करणारे ठेकेदार प्रकाश मराठे यांच्याकडे ते कामाला होते. मराठे यांनी गायत्रीनगरातील एका बंगल्यातील काम घेतले होते. त्यामुळे कैलास हे शनिवारी सकाळी कामाला आले होते. मात्र, सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरून पडले. यात त्यांच्या हाता-पायाला व डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. इतर मजुरांना ही घटना दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती महाजन यांना मृत घोषित केले. यावेळी मराठे यांच्यासह महाजन यांच्या नातेवाइकांची रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. प्राथमिक तपास विकास सातदिवे आणि ललित नारखेडे हे करीत आहेत.