जळगाव : प्रतिनिधी
सावखेडा शिवारातील वर्धमान युनिव्हर्स सीबीएसई स्कूलमधील कार्यालय फोडून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता चोरट्यांनी शाळेकडे धाव घेत चोरी सुरु केल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील सावखेडा शिवारात वर्धमान सीबीएसई स्कूल आहे. बुधवार, दि. १५ मार्चच्या मध्यरात्री चोरट्यांनी कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून स्कूलमध्ये प्रवेश केला. मुख्य गेटचे कुलूप तोडल्यानंतर चोरट्यांनी स्कूलच्या कार्यालयातील सुद्धा कुलूप तोडून २५ हजार रुपयांची रोकड आणि काही कागदपत्रे चोरून नेली. हा प्रकार १६ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आठ दिवसानंतर मुख्याध्यापक आशिष अजमेरा यांनी तक्रार दिल्यानंतर तालुका पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास लिलाधर महाजन करीत आहेत.