चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने मोठ्या भावाचा शेतातच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत अडावद पोलिसात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरु होते.
मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील मीतावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रित १० एकर शेती करतात. दोघंही विवाहीत असून शनिवारी दि २५ रोजी दोन्ही मुले संदिप व सतीष पाटील हे पारगाव शिवारात असलेल्या भेंडी तोडण्यासाठी शेतात गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. ३३ वर्षीय सतिष या लहान भावाने मोठा भाऊ संदिप पाटील (३६) याच्यावर धारदार विळ्याने वार करीत शेतातच खून केला. गावापासून शेत दूर असल्याने घटना लवकर उघडकीस आली नाही.
या घटनेची वार्ता गावात पोहचताच पो.पा.सोपान पाटील यांनी शेतात येऊन खात्री केली. अडावद पोलिस स्टेशनला माहीती दिली असता. एपीआय गणेश बुवा पी.एस.आय.चंद्रकात पाटील स.फौजदार सुनील तायडे, जयदीप राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाची घटना असल्याने एपीआय यांनी विभागीय पोलिस अधिकारी ॠषीकेश रावले यांना घटनेची माहिती दिली ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी जळगाव येथून ठसे तज्ञांना पाचारण करून पुरावे ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा येथे पाठवला. मयत व आरोपी दोन्ही भावांना एक-एक मुलगा व एक- एक मुलगी आहे. आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले असून सख्या भावानेच भावाचा खून का केला याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सदर घटनेबाबत अडावद पोलिस स्टेशनला उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.