मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरु असतांना ठाकरे व शिंदे गटातील वाद देखील सुरु आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर आलेली, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पण आपण खोके घेतले नाहीत. निष्ठा सोडली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले, आम्हालाही सांगण्यात आल कशाला राहताय? काय राहिलंय? तुम्ही आमच्याकडे या. मी म्हटलं, मी थुकतो तुमच्या ऑफरवर. मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आमची शिवसेना यांच्याशी बेईमानी करणार नाही. थुंकतोय तुमच्या ऑफरवर या भाषेत बोललो.
आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही खोके घेतले असते आणि गुडघे टेकले असते तर आम्ही त्या पदावर राहिलो असतो. एखाद्या पदासाठी लाचारी पत्कारणारा संजय राऊत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत ना, ते निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत, असेही राऊत म्हणाले.
पद आज आहे, आज गेली उद्या परत येतील. तेवढी हिंमत आमच्या पक्षात आणि नेतृत्वात आहे, असं संजय राऊतांनी सांगितले आहे. माझ्या पक्षाने मला जे दिलंय ते भरपूर दिलेलं आहे, असेही ते म्हणाले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. त्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावर गच्छंती करण्यात आली आहे.